नवाब मलिक यांच्या कोठडीत वाढ; 6 मे पर्यंत तुरुंगात मुक्काम


नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ, 6 मे पर्यंत तुरुंगात करावा लागणार मुक्काम 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने 23 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. आज पुन्हा मुंबईच्या सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने 6 मे पर्यन्त न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांचा तुरुंगातील मुक्काम 6 मे पर्यंत वाढला आहे.

दाऊद इब्राहिमची टोळी, क्रिकेटची सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून 'ईडी' ने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणात दाऊद चा भाऊ इकबाल कासकर याला ईडी ने ताब्यात घेऊन चौकशी केली होती.चौकशी दरम्यान दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेली सुमारे 300 कोटीच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी नवाब मलिक यांचा संबंध असल्याचे 'ईडी'ने केलेल्या तपासात निष्पन्न झाले होते. त्यावरूनच नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती.

दाऊदशी संबंधित टोळीने अनेकांना धमकावून जबरदस्तीने वादातील मालमत्ता बळकावल्या होत्या. त्यापैकी एक पीडित मुनीरा प्लम्बर यांची कुर्ला येथे 3 एकर जमीन होती. सध्या त्या जमिनीची किंमत 300 कोटी रुपये आहे. ही 300 कोटी रुपयांची जमीन नवाब मलिक आणि हसीना पारकर यांनी बळकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.


Previous
Next Post »