"होऊ शकत है " असा विश्वास निर्माण करून राष्ट्रीय राजकारणात आंबेडकरी राजकारण यशस्वी करणारे मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी नमन..

बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंती निमित्त या लेखाच्या माध्यमातून विनम्र अभिवादन 
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर "होऊ शकत है " असा विश्वास निर्माण करून देशातील राष्ट्रीय राजकारणात आंबेडकरी राजकारण प्रस्थापित करण्यासोबतच ते यशस्वी करून दाखणारे मान्य. कांशीरामजी यांच्या जयंती निमित्त त्यांचा जिवन संघर्ष या लेखातून मांडण्याचा छोटासा प्रयत्न. कांशीरामजी जन्म 15 मार्च 1934 रोजी पंजाब मधील रोपड जिल्ह्यात 'ननिहाल' या गावी रविदासीया समाजात  झाला.
पुण्यातील ऑर्डिनन्स फॅक्ट्रीत 1962-63 मध्ये अनुसंधान अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांना एक प्रसंग पहायला मिळाला. तो म्हणजे कांशीरामजी जिथे काम करायचे त्याच कार्यलयात दिना भाना नावाचा एक शिपाई होता. दिना भाना हा कार्यालयीन अधिकाऱ्याला 14 एप्रिल च्या दिवशी सुट्टी पाहिजे असं सांगत होता. परंतु अधिकाऱ्याने सुट्टी देण्यास नकार दिला. त्यावर दिना भाना याने सांगितले की मला तुम्ही सुट्टी नाही दिली तरी मी 14 एप्रिल ला कामावर येणार नाही.
त्यावर अधिकाऱ्याने सांगितले की तू जर कामावर आला नाही तर तुला नौकरीवरून कायमचे काढून टाकण्यात येईल. त्यावर तो शिपाई म्हणाला मला नौकरीवरून काढून टाकले तरी चालेल परंतु मी 14 एप्रिलच्या दिवशी कामावर येणार नाही. त्यावर त्या अधिकाऱ्याने दिना भानाला विचारलं की 14 एप्रिलला असं काय आहे की तू नौकरी देखील सोडायला तयार आहेस. त्यावर दिना भाना म्हणाला की 14 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंवेडकरांची जयंती आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे मी कामावर येऊ शकत नाही.
मनुवादी मानसिकता असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले की आता तर तुला मुळीच सुट्टी मिळणार नाही.त्यावर पुन्हा दिना भाना म्हणाला काहीही झाले तरी मी उद्या कामावर येणार नाही. हे सर्व संभाषण होत असताना कांशीरामजी ऐकत होते. त्यांनी विचार केला की डॉ बाबासाहेब आंबेडकर अशी कोण व्यक्ती आहे की ज्यांच्या जयंती साठी सुट्टी मिळाली नाही तर नौकरी सोडायला हा शिपाई तयार आहे. त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न कांशीरामजी करत होते.
त्यासाठी त्यांनी बाबासाहेब आंबेडकर लिखित जातीचा समूळ नाश (Annihilation of caste ) हे पुस्तक अनेक वेळा वाचून डॉ बाबासाहेब आंबेडकर समजून घेतले आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अपूर्ण राहिलेलं शासनकर्ती जमात बनण्याचं स्वप्न मी पूर्ण करणार. त्यानंतर त्यांनी नौकरी सोडली आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाहेर पडले ते बहुजन समाजाला शासन कर्ती जमात बनविण्यासाठी.
बाबासाहेब आंबेडकर नेहमी खंत व्यक्त करायचे की मला शिकलेल्या समाजाने धोका दिला. हा धागा पकडून कांशीरामजीने शिकलेल्या व नौकरी, व्यवसायात असलेल्या लोकांची 6 डिसेंबर 1978 साली (BAMCEF )बहुजन आंबेडकराईट अँड मायनॉरिटीज कम्युनिटीज एम्प्लॉयी फेडरेशन या अराजकीय संघटनेची स्थापना केली.पुढे 6 डिसेंबर 1981 मध्ये दलित शोषित समाज संघर्ष समिती (DS4) ची स्थापना केली.
त्यानंतर 14 एप्रिल 1984 रोजी कांशीरामजी यांनी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण भारतभर काश्मीर ते कन्याकुमारी त्यांनी प्रचार आणि प्रसार केला.
4 हजार 500 किमी त्यांनी सायकलवर फिरून बहुजन समाजातील 6 हजार जातींना जोडण्याचं काम केलं. आणि लोकांमध्ये "होऊ शकत है "असा ठाम विश्वास निर्माण करत बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून देशातील राष्ट्रीय राजकारणात आंबेडकरी राजकारण प्रस्थापित करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे शासन कर्ती जमात बनण्याचे स्वप्न साकार केलं. अशा महान नायकास आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने कोटी कोटी नमन..
                                                            संपादकीय..
Previous
Next Post »