OBC Reservation : केवळ आडनावावरून जात ओळखणे चुकीचे - छगन भुजबळ

आडनावावरून जात गृहीत धरणे चुकीचे - मंत्री छगन भुजबळ.
मुंबई : राज्यात ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी राज्यात सध्या ओबीसीचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम सुरु आहे. मात्र हा डेटा गोळा करताना आडनावावरून ओबीसीची जात गृहीत धरल्या जात आहे. त्यामुळे आडनावावरून जात ओळखणे चुकीचे आहे. ओबीसीची खरी लोकसंख्या दिसणार नाही असं मत राज्याचे अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.आडनावावरून ओबीसी ची जात गृहीत धरणे ही पद्धत चुकीची असून यात सर्व पक्षीय नेत्यांनी लक्ष घातले पाहिजे असेही मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.

यासंदर्भात बोलताना छगन भुजबळ म्हणाले की राज्यात पवार,जाधव,गायकवाड, शेलार,होळकर अशी अनेक प्रकारची आडनावे आहेत.ही आडनावे वेगवेगळ्या जातीत आढळतात. समर्पित आयोगाने ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडून निवडणूक यादीतील प्रत्येक जातीची माहिती निवडणूक आयोगाकडे पाठवावी. परंतु यामध्ये काही चुका आढळून येत आहेत.एकच आडनाव एकाच जातीत असल्याचे गृहीत धरून माहिती पाठवली जात असल्याचे समोर आले आहे.

अशाप्रकारच्या सदोष माहितीमुळे ओबीसीची खरी टक्केवारी समोर येणार नाही.अशा प्रकारच्या सदोष माहितीच्या इम्पेरिकल डेटामुळे ओबीसीवर अन्याय होईल.मात्र आम्ही हा अन्याय होऊ देणार नाहीत.ही बाब आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊ व यात योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन राज्य मागासवर्गीय आयोगाला करणार आहोत.

 सत्य परिस्थिती आयोगाच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे 
याबाबतीत राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा असाच प्रश्न उपस्थित केला आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी असे प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा बांटिया आयोगाला भेटून निवेदन दिले पाहिजे तसेच राज्यातील सर्व ओबीसी संघटनानी पुढे येऊन बांटिया आयोगासमोर सत्य परिस्थिती मांडली पाहिजे.तसेच स्थानिक पातळीवरून आयोगापर्यंत येणाऱ्या प्रत्येक माहितीच्या प्रक्रियेत लक्ष घालून योग्य ती माहिती आयोगापर्यंत कशी पोहचेल याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे.असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे.

डेटा गोळा करण्याचे काम स्थानिक पातळीवर सुरु
राज्यातील इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम हे स्थानिक पातळीवर सुरु आहे. राज्यातील स्थानिक पातळीवरील महसूल यंत्रनेचा वापर करून इम्पेरिकल डेटा जमा केला जाऊ शकतो. त्यासाठी तसे आदेश अधिकाऱ्यांना देण्याची गरज असून गावातील ग्रामसेवक, सरपंच, तलाठी पोलीस पाटील यांना गावातील सर्व माहिती असते.त्यासाठी त्यांची मदत घेऊन डेटा जमा करणे आवश्यक असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
Previous
Next Post »