महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला कलंक ;स्मशानभूमीत मागासवर्गीयांच्या अंत्यविधीला सवर्णाकडून विरोध

महाराष्ट्र खरच पुरोगामी विचाराचा आहे का?
महाराष्ट्र हा अनेक संतांची जन्म भूमी आहे. जिथे वारकरी संप्रदायचा वारसा मोठ्याप्रमाणात आहे. फुले शाहू आंबेडकर विचारांचा महाराष्ट्र असल्याचा डंका सर्वच राजकीय पक्ष व नेत्याकडून वाजवीला जातो. परंतु खरच याची वास्तविकता तशी आहे का?. केवळ राजकीय पक्षांच्या नेत्यांना मतं मिळविण्यापुरताचा हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे.

दोन दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील  माळवाडी बोरगाव या गावी अशीच एक घटना घडली आहे. मागासवर्गीय समाजातील मातंग व्यक्ती चा मृत्यू झाला होता. अंत्यविधी साठी मयताचे प्रेत स्मशान भूमीत नातेवाईक घेऊन जात असताना गावातील सवर्ण म्हणवणाऱ्या गावगुंडानी अडविले. अंत्यविधी स्मशान भूमीत करण्यास विरोध केला. गावगुंडानी पोलीस बोलावून अंत्यविधी थांबवला.नातेवाईक विनंती करत होते तरी पण प्रेत स्मशान भूमीत नेवू दिले नाही. तब्बल आठरा तासानंतर विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या पुढाकाराने गावातील ग्रामपंचायत समोर संध्याकाळी सात वाजता अंत्यविधी करण्यात आला.

प्रकरण एवढ्यावरच थांबले नसून ग्रामपंचायत समोर अंत्यविधी का केला म्हणून मयताचे नातेवाईक व इतर अशा जवळपास 20 लोकांवर गावातील सवर्ण गावगुंडानी गुन्हा दाखल केला आहे.एक तर स्मशान भूमीत अंत्यविधी करू दिला नाही.ती ही पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत अशी दुर्दैवी घटना घडते. शेवटी तब्ब्ल आठरा तासानंतर मयताचा अंत्यविधी ग्रामपंचायत समोर करावा लागतो आणि उलट मयताच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल केले जातात ही घटना पुरोगामी महाराष्ट्र आणि सरकारसाठी शरमेची बाब आहे.

या घटनेवरून हे लक्षात येते की फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र केवळ बोलण्यापुरताच आहे.याची वास्तविकता अजूनही मनुवादी विचारांचीच आहे. केवळ हीच घटना नाही तर अशा अनेक घटना मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचार होताना दर रोज कुठेना कुठे पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात घडतात.

सरकार आणि पोलीस प्रशासन या प्रकरणातील आरोपीला अभय देते, त्यांना पाठीशी घालते त्यामुळेच असे प्रकार नेहमी घडताना दिसतात. यावरून महाराष्ट्र खरच पुरोगामी विचाराचा आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.
Previous
Next Post »